आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – सन 2017-18

        

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत आली.

सदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 321 शाळांमधील RTE अंतर्गत 25 % आरक्षित विद्यार्थी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण 3269 जागांसाठी दि. 08/02/2017 ते दि. 02/03/2017 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत आले. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1330 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता दि. 08/03/2017 ते दि. 27/04/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाच्या 5 फे-या घेणेत आल्या. यामध्ये एकूण 560 पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित केला व 210 विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरविणेत आले.

पालकांच्या आग्रहास्तव दि. 30/04/2017 ते दि. 10/05/2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारणेची दुसरी फेरी घेऊन नव्याने पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविणेत आले. या कालावधीत एकूण 341 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता दि. 12/05/2017 ते दि. 02/06/2017 या कालावधीत विद्यार्थी प्रवेशाच्या 2 फे-या घेणेत आल्या. यामध्ये एकूण 170 पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित केला व 98 विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी अपात्र ठरविणेत आले.

अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी एकूण 730 विद्यार्थ्यानी RTE च्या 25 % आरक्षित कोट्याअंतर्गत शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे.

 

 

(श्री. सुभाष रा. चौगुले)