कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ” वाचाल तर वाचाल ” या व्याख्यानमालेचे आयोजन

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व्याख्यानमालेचे आयोजन करणेत येत आहे. या उपक्रमांतर्गंत दरमहा अखेर व्याख्यानाचे आयोजन करणेत येते. दि.31/05/2017 इ. रोजी दुपारी 4.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते व श्वसन विकार तज्ञ डॉ.अनिल मडके यांनी गुंफले. या वेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार,समाजकल्याण सभापती श्री.विशांत महापूरे,प्रकल्प संचालक डॉ.हरिष जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.ए.जी.मगदूम यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री.संदिप मगदूम यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून व्याख्याते डॉ.अनिल मडके यांनी केलेले कार्य सांगितले.

डॉ.अनिल मडके यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील व्याख्यानामध्ये माणसाच्या जीवनातील वाचनाचे महत्व विषद करणेसाठी अनेक उदाहरणे दिली. आयुष्यातील छोटया छोटया गोष्टी निट करण्याचा संस्कार वाचन शिकवते. माणसाच्या जीवनावर ताणतणावाचा विपरीत परिणाम होत असून तो दूर करण्याच्या उपाय वाचन आहे. चांगले पुस्तक हे मधमाश्यांच्या पोळयाप्रमाणे असते,त्यातून गोडवा,जीवन व प्रकाश मिळतो. शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मेंदूला मशागतीची गरज असते,आणि ही मशागत वाचनातून होते. हल्ली माणसाचे बोलणे वाढले आहे परंतु वाचन कमी झाले आहे. जीवन समृध्द करायचे असेल तर वाचन गरजेचे आहे. चांगले पुस्तक हा माणसाचा मित्र आहे. लेखक हा जन्माला यावा लागतो,तो घडविता येत नाही;याउलट वाचक घडावा लागतो. अशा रीतीने डॉ.अनिल मडके यांनी  या आपल्या व्याख्यानाने कर्मचारी व अधिकारी यांना मंत्रमुग्ध केले.

समारोपाच्या मनोगतामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंद्रजित देशमुख यांनी माणसाच्या आयुष्यात वाचन व लेखन यांना अनन्यसाधारण महत्व असलेने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नियमित वाचन करावे असे आवाहन केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषेचा महिमा सांगताना महाराष्ट्रातील थोर संतांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या लेखनाची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा  हागणदारी मुक्त योजनेत राज्यात प्रथम आल्याबद्दल महराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचा सत्कार करणेत आला.  सदर व्याख्यानाच्या आयोजनाकामी सहकार्यबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्रतिनिधींचा सत्कार करणेत आला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.ए.जी.मगदूम यांनी आभार मानले.

 

                                                      शिक्षणाधिकारी (प्राथ.)

                                                      जिल्हा परिषद कोल्हापूर