पूरग्रस्त गावांना स्वच्छतेसाठी निधी (स्वच्छता आणि घनकचरा – सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावांना मिळणार निधी )

कोल्हापूर : दिनांक – १५ ऑगष्ट  २०१९

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील  ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या गंभीर परिस्थिती मध्ये गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्ष्यात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कच-याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करावयाच्या बाबीकरिता शासनाकडून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे .

या ग्रामपंचायतींना सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रु ५०,०००/- आणि  १००० पेक्ष्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये १,००,०००/- विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत घोषित केलेल्या पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाणार आहे.

या निधी अंतर्गत ग्रांमपंचायत स्तरावर खालील प्रमाणे स्वच्छेतेची कामे घेण्यात येणार आहेत.

१. गाव स्तरावरील स्वच्छेतेसाठी  लागणारे अतिरिक्त रोजंदारीवर मनुष्यबळ उपलब्ध करणे.

२. सार्वजनिक स्वच्छेतेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. (धुरळणी , धूर फवारणी, निर्जंतुकीकरण साधनांद्वारे स्वच्छता करणे. इत्यादी )

३. घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे .

४. आवश्यक साधने भाड्याने घेणे.

५. स्वच्छतेसाठी आवश्यक कामे करणे.

वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही करून लोकांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी. या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही व आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी असे आवाहन मा. श्री. अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.

(प्रियदर्शिनी चं. मोरे )

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.)

जिल्हा परिषद कोल्हापूर