DRDA Programe & Education primary Examination

मा. सौ. संयोगीताराजे छत्रपती प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करताना. शेजारी श्री. एस. जी. किणींगे, अग्रणी जिल्हा प्रबंधक, कोल्हापूर, श्री. एच. टी. जगताप, प्रकल्प संचालक, जि.ग्रा,वि.यं., कोल्हापूर आणि श्री. पी. बी. लोहार, संचालक, आरसेटी, कोल्हापूर.

“ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी व त्यातून आपली, आपल्या कुटुंबाची उन्नती साधावी. दुग्ध व्यवसाय करण्यात प्रामुख्याने महिलांचा खूप मोठा हात आहे. पण तो पारंपारिक पद्धतीने न करता शास्त्रशुद्ध व आधुनिक पद्धतीने केला तर चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. महिलांनी सर्व गोष्टीत पुढाकार घेण्याचे ठरवले तरच महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही संकल्पना पूर्णत्वास जाईल. तसेच, व्यवसायासाठी आवश्यक भांडवल योग्य व्यक्तीस योग्य प्रकारे पुरवण्यास बँकासुद्धा तत्पर आहेत ” असे विचार बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. एस. जी. किणींगे यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाच्या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जि.ग्रा.वि.यं., कोल्हापूर चे प्रकल्प संचालक श्री. एच. टी. जगताप आपल्या मनोगतात म्हणाले, “आजही दुग्धव्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहे. पण तो व्यावसायिकदृष्ट्या केला पाहिजे. फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता महिलांनी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांचा, विविध योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उदयोजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठीच महिला बचत गटाची चळवळ जोरात सुरु आहे. मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनले पाहिजे. परिणामी समाजात आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढेल. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराभिमुख करण्यासाठी मा. डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद/ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर आणि बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) यांचे संयुक्त विद्यमाने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित करत आहे.”

मा. संयोगिताराजे छत्रपती आपल्या मनोगतात म्हणाल्या,” मा. छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे चालवताना सामन्यातील सामान्य व दुर्गम भागातील लोकांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मा. संभाजी राजे छत्रपती यांनी शाहुवाडी तालुक्यातील येळवण जुगाई हे गाव संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत दत्तक घेतले आहे. त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अतिशय नियोजन पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येळवण जुगाई गावातील १४ महिलांना त्यांच्या आवडीनुसार दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर संस्थेकडे पाठवले. आज या प्रशिक्षणाच्या समारोपाच्या निमित्ताने महिलांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून असे दिसून येते की या ६ दिवसात आरसेटी कोल्हापूरने एक परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे ज्यामुळे या महिला भविष्यात यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे येतील. भविष्यात अशा विविध प्रशिक्षणांचा लाभ येळवण जुगाई गावातील लोकांना व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करून त्यांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)  कोल्हापूर या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर चे संचालक श्री. प्रदीप लोहार, श्री. रणदीप भिलवडीकर, गट समन्वयक आणि आरसेटी चे स्टाफ श्री. बाजीराव पाटील, श्री. मदन पाटील, सौ. कल्पना कुलकर्णी उपस्थित होत्या.