आर.टी.ई. 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 2019-20 अंतर्गत तिस-या प्रवेश फेरीस सुरूवात

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. या अंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https:// student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविणेत येत आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या दोन फे-या पूर्ण झालेल्या आहेत. आता प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर दि. 10/07/2019 इ. रोजी तिसरी लॉटरी काढणेत आलेली आहे. तसेच NIC सेंटर, पुणे यांचेकडून तिस-या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी RTE पोर्टलवर अपलोड करणेत आलेली आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह SMS पाठविणेत येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील SELECTED व NOT SELECTED या टॅबवर जाऊन अथवा Application Wise Details मध्ये आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरीची खात्री करावी. ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म USER ID व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये ADMID CARD या TAB वर क्लिक करून त्याची प्रिंट काढावी. पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीतील शिक्षण विभागात जावयाचे आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले ADMIT CARD व प्रवेशासंबंधीची सर्व मूळ कागदपत्रे सादर करून तपासून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी नियमानुसार पात्र असलेबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्रासह पालकांनी संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत गेलेस पाल्यास प्रवेश दिला जाणार नाही. शाळांनीही पडताळणी समितीने शिफारस केलेखेरीज कोणत्याही विद्यार्थ्यास RTE च्या 25 % कोटयातून प्रवेश द्यावयाचा नाही. पडताळणी समितीने अपात्र ठरविलेल्या बालकांची निवड रद्द करणेत येईल.

तिस-या फेरीतील विद्यार्थी प्रवेशाचा कालावधी हा दि. 11/07/2019 ते दि. 18/07/2019 असा निश्चित करणेत आलेला आहे. सदर कालावधीत संबंधित पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.

 

 

 

(श्रीम. आशा उबाळे)

                                                                                शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                 जिल्हा परिषद, कोल्हापूर