कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत संयुक्तरित्या सर्व शिक्षा अभियान ही महत्वकांक्षी योजना राबविणेत येते. या योजनेंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शाळाबाह्य मुलांना विशेष प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत व्दिभाषिक पुस्तके, संगणक शिक्षण अंतर्गत डिजीटल वर्ग, दिव्यांग मुलांना साहित्य साधने, मुलींच्या शिक्षणाच्या योजना, शिक्षक प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबविणेत येतात. सदर उपक्रमांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु असलेबद्दल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे कार्यक्रम अधिकारी श्री.प्रमोद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

सर्व शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2001 पासून राज्यात सुरु आहे. राज्यस्तरावरुन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांना आवश्यक निधी पुरवठा तसेच उपक्रम अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले जाते. सन 2016-17 या वर्षामध्ये उपरोक्त सर्व उपक्रमांसोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम व विशेष प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील 730 शाळांना व्दिभाषिक पुस्तक खरेदीसाठी तर 58 उच्च प्राथमिक शाळांना डिजीटल वर्ग निर्मितीकरिता अनुदान देणेत आले होते. या उपक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती घेणेसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कार्यक्रम अधिकारी श्री.प्रमोद पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी दि.24/04/2017 रोजी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, लेखा सहाय्यक यांनी बैठक घेवून जिल्ह्यामध्ये राबविणेत आलेल्या उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच दि.25/04/2017 रोजी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देवून उपक्रमांची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी केंद्रशाळा गडमुडशिंगी, संजीवन वि.मं. चंदूर, सहारानगर वि.मं. रुई, वि.मं. मौजे सांगाव, म.न.पा. टेंबलाईवाडी विद्यालय, बालभारती कार्यालय या ठिकाणी भेटी दिल्या. सदर भेटीदरम्यान विद्यार्थी वाचन विकासासाठी व्दिभाषिक पुस्तक खरेदी, डिजीटल वर्ग निर्मिती, वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी, मोफत पाठ्यपुस्तके आदी उपक्रमांबाबत आढावा घेवून मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.सुभाष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असलेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री.बी.एम.कासार, लेखाधिकारी श्री.डी.डी.कुंभार, प्रोग्रामर श्री. जी.बी. पुरेकर, जिल्हा समन्वयक श्रीम.आम्रपाली देवेकर, श्री.बी.बी.पाटील, श्री.मारुती जाधव, श्री.एस.एच.ढवळे, श्री.एस.बी.कदम, श्री.अमोल पाटील, श्री.आर.एम. धनवडे, आदी उपस्थित होते.