नमामि पंचगंगे ” अंतर्गत प्रयाग चिखलीच्या घाटावर महाश्रमदान स्वच्छतेसाठी २६३ जणांनी केले श्रमदान

“ नमामि पंचगंगे” अंतर्गत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विविध उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत तिथीनुसार पंचगंगेच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने आज प्रयाग चिखली, ता. करवीर येथे पंचगंगेच्या घाटावर महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या वर्षभरामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत देखील दि. २४ जून २०१८ पासून नमामि पंचगंगे  हा उपक्रम हाती घेतला. दिनांक २४ मे २०१८ ते ११जून २०१८ या कालावधीत पहिल्या टप्प्यात नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये दोन गावामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक गणेश उत्सव उपक्रमाद्वारे नदी प्रदूषण थांबविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला. नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या  नदी काठच्या गावांना या वर्षभरात घ्यावयाचे जनजागृती उपक्रम आणि श्रमदानाचे उपक्रम देण्यात आले होते. त्याप्रमाणे या गावामध्ये श्रमदानातून बंधारे घालणे, कर्दळ लागवड करणे, श्रमदानातून स्वच्छता करणे तसेच चित्ररथ आणि पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करणे असे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना सर्वच गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

याच पद्धतीने प्रदूषण मुक्तीच्या पुढच्या टप्प्यातील उपक्रमांचा शुभारंभ हा आज प्रयाग चिखली येथील पंचगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करून करण्यात आला आहे.

या महाश्रमदानासाठी मा. शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. श्री. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महानगर पालिका, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,जि. प. कोल्हापूर, मा. आर.पी. शिवदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.कोल्हापूर, मा. अजयकुमार माने, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर, मा. संजय राजमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जि. प. कोल्हापूर,मा. राजेंद्र सूर्यवंशी, सभापती, पंचायत समिती करवीर, मा. सौ. प्रियांका पाटील, सदस्या, जि. प. कोल्हापूर, मा. श्री.रवीकांत अडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), मा. श्री राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), श्रीम.प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.), मा. सोमनाथ रसाळ, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. डॉ. एस. एस. शिंदे, समाजकल्याण अधिकारी, मा. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी, मा. डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर  तसेच मा. मोहन पाटील, सदस्य, पंचायत समिती करवीर, मा. सचिन घाडगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती करवीर, श्री. उदय गायकवाड, मा. उमा पाटील, सरपंच, प्रयाग चिखली, मा. सौ. अपर्णा पाटील, सरपंच, वरणगे, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते.

या श्रमदानातून पंचगंगा नदी घाट परिसर आणि नदी पात्रातून सुमारे ४ टन कचरा संकलित करण्यात आला. कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, तुटलेल्या काचा, फ्रेम, बूट- चप्पल, काचेच्या बाटल्या इ. वस्तू कचरा स्वरूपात जमा करण्यात आल्या.

या श्रमदानासाठी  जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच पंचायत समिती करवीर आणि पन्हाळा येथील कर्मचारी, ग्रामस्थ, तसेच तरुण मंडळे यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये २६३ जणांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष 

जिल्हा परिषद , कोल्हापूर